रफी@100 : खुद्द मन्ना डे म्हणाले होते, 'माझ्यासारखे हजारो मिळतील, पण रफी दुसरा मिळणार नाही'

- Author, वंदना
- Role, सीनियर न्यूज एडिटर, बीबीसी न्यूज
बर्फाळ हिमालयातल्या पर्वतावर खुल्लम-खुल्ला प्रेमाची कबुली देणाऱ्या दिलखुलास, रंगील्या शम्मी कपूरसाठी 'याहू... चाहे कोई मुझे जंगली कहे...' गाण्यासाठी आवाज हवा होता, तेव्हा त्या रांगड्या शम्मीच्या अलवार प्रेमासाठी अगदी चपखल बसणारा आवाज मिळाला होता – रफी साहेबांचा!
प्रेमाच्या अपरंपार रूपाची चर्चा होते तेव्हा रफीच्या आवाजातली एक कव्वाली हटकून आठवते - 'ये इश्क़ इश्क़ है, इश्क़ इश्क़... इश्क़ आज़ाद है, इश्क़ आज़ाद है, हिंदू न मुसलमान है इश्क़.'
हा तोच भक्तिरसात ओतप्रोत भरलेला रफीचा आवाज असतो जो - 'मन तपड़त हरि दर्शन को आज...' असं आळवतो. पडद्यावर गुरुदत्त भारताची स्थिती आणि पारतंत्र्याविषयी कळकळीने काही सांगू इच्छितो, तेव्हा हाच रफीचा आवाज गातो - 'जिन्हें नाज़ है हिंद पर, वो कहाँ हैं...'
लोकप्रिय गायक मोहम्मद रफी यांच्या गायकीचे हे मोजके रंग. अशा अगणित छटा त्यांच्या गायकीत सापडतील. त्यातल्या काहींचा वेध घ्यायचा प्रयत्न केला आहे तो त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने :
मोहम्मद रफी आणि शम्मी कपूर यांची जोडी
सिनेमातलं हिट गाणं म्हणजे मोहम्मद रफीचा आवाज असा एक काळ होता. रफी जाऊन इतकी वर्षं झाली तरी त्यांच्या आवाजाची मोहिनी कायम आहे आणि त्याचबरोबर ऐकणाऱ्याचे मन जिंकून घेणारे त्याविषयीचे किस्से सांगताना आजही लोक थकत नाहीत.
शम्मी कपूर यांच्याविषयीचे किस्से याचं एक उदाहरण. मुकेश ज्याप्रमाणे राज कपूर यांचा पडद्यामागचा आवाज होते, तसे मोहम्मद रफी शम्मी कपूर यांचा आवाज होते, असं म्हणतात.
सुजाता देव यांचं पुस्तक – 'मोहम्मद रफी- अ गोल्डन व्हॉइस' यात शम्मी कपूर यांनी एक आठवण सांगितली आहे. "आम्ही 'तारीफ़ करूँ क्या उसकी...' रेकॉर्ड करणार होतो. मला त्याआधीची रात्र अजिबात झोप लागली नव्हती. मला वाटत होतं की हीच गाण्याची शेवटची ओळ रीपिट होत रहावी आणि त्यातच गाणं संपवावं. पण माझा हा सल्ला संगीतकार ओपी नय्यर यांना नाही रुचला नाही.
मी थोडा नाराज झालो. माझी निराशा पाहून ओपी नैय्यर यांना रफीने समजावलं – पापाजी तुम्ही कंपोजर आहात, मी गायक आहे. पण पडद्यावर तर शम्मी कपूर दिसणार आहे. शम्मीलाच एक्टिंग करायची आहे ना. त्याला करू दे. ते चांगलं वाटलं नाही, तर आपण पुन्हा रेकॉर्ड करू. रफीने शेवटी मला हवं होतं, तसंच केलं."
शम्मी कपूर सांगतात, "ओपी नैय्यर यांनी जेव्हा गाणं पाहिलं तेव्हा मला मिठी मारून कौतुक केलं. रफी साहेबांनी आपल्या मिश्किल आवाजात विचारलं – काय झालं ना काम? रफी साब असे होते. एका झटक्यात मन जिंकायचे सर्वांचं. मोहम्मद रफीशिवाय मी खरंच अपूर्ण आहे."


'रफी मियाँ, काय सुंदर गायलात तुम्ही'
सुप्रसिद्ध गायक मन्ना डे यांची एक खूप जुनी मुलाखत माझ्या कायम स्मरणात आहे. त्यावेळचे पत्रकार राजीव शुक्ला यांच्या एका प्रश्नावर मन्ना डे म्हणाले होते – "रफी साहब नंबर वन होते. माझ्यापेक्षा चांगले गायचे. मी स्वतःची तुलना केवळ रफींबरोबर करतो. ते गायचे तसं गाणं एखाद्यालाच जमेल. रफी नसते तर कदाचित ती नंबर वनची जागा मी घेतली असती. आम्ही दोघे असे गायक होतो जे कुठल्याही प्रकारची गाणी गाऊ शकायचो."

फोटो स्रोत, YASMIN K RAFI
मोहम्मद रफींच्या कारकीर्दीत मुकेश आणि किशोर कुमार यांनीही हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीत गाजवायला सुरुवात केली होती. पण या सगळ्या कलाकारांचं आपसातलं नातं खूप चांगलं होतं.
मुकेश यांचे चिरंजीव नितीन मुकेश यांनी बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं – "या सगळ्यांमधलं नातं खूप सुरेख होतं. मला फार गंमत वाटायची जेव्हा फोन उचलून मुकेशजी रफी साहेबांना म्हणायचे – रफी मियाँ, अरे किती सुंदर गायलात तुम्ही. मला तुमच्यासारखं गाता आलं असतं तर... तर कधी रफी साहेबांचा फोन यायचा – मुकेश किती छान गायलास तू – हे सांगायला."
रफी म्हणतात – माझ्या गळ्यात थोडा गोडवा भरा
एवढी प्रसिद्धी, अशी दाद आणि बेसुमार लोकप्रियता मिळूनही मोहम्मद रफी आपलं गाण अधिक चांगलं व्हावं याकरिता रियाज आणि मेहनत घेण्यात कमी पडत नसत. संगीतकार खय्याम यासंबंधीचा एक किस्सा नेहमी सांगत असत.
खय्याम सांगायचे, "रफी मला सारखं सारखं मेजवानीसाठी आमंत्रण द्यायचे. मी म्हटलं काय कारण आहे एकदा बघूच. मग रफींकडून मला एक आग्रहपूर्वक विनंती करण्यात आली - आप मेरी आवाज़ में मिठास भर दीजिए. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा रफी खरोखरच लोकप्रियतेच्या शिखरावर होते. मला तर खरंच वाटलं नाही ते का असं सांगतायत. त्या काळात रफी हाय पीचवाली गाणी अधिक गायचे."
"मी त्यांच्यासमोर काही अटी ठेवल्या. जसं की - तुम्ही एक महान गायक आहात हे काही काळासाठी विसरून जा. रिहर्सलच्या वेळी त्यांच्या आसपास कुणीही असणार नाही. त्या दरम्यान अगदी फोनवरही त्यांनी कोणाशी बोलता कामा नये. रफी साहेबांनी माझ्याकडून अगदी तन्मयतेने ट्रेनिंग घेतलं. त्याचा परिणाम दिसला जेव्हा त्यांनी गजल गायली - 'ग़ज़ब किया तेरे वादे पर ऐतबार किया...' जो आवाजातला गोडवा रफींना अपेक्षित होता तो त्यांना सापडला."

फोटो स्रोत, YASMIN K RAFI
'रफी मियाँ, मी काय म्युझिक स्कूल उघडलंय का...'
मोहम्मद रफींचा आवाज आणि गायनशैली याव्यतिरिक्त लोक त्यांचं कशासाठी कौतुक करायचे तर त्यांच्या शांत आणि नम्र स्वभावासाठी.
संगीतकार अमर हल्दीपूर यांनी सुजाता देव यांच्या पुस्तकात त्याबद्दल सांगितलं आहे – "1967-68 मध्ये मोहम्मद रफींना घेऊन सी. रामचंद्र एक गाणं रेकॉर्ड करत होते. रफींकडून एक तुकडा गाताना पुन्हा पुन्हा चूक होत होती. कितीतरी वेळा रेकॉर्डिंग करावं लागलं. सी. रामचंद्र शेवटी चिडले. म्हणाले – रफी मियाँ, काय चाललंय काय? मी काय इथे म्युझिक स्कूल उघडलंय का? जे गाणं दिलंय, त्याची चाल नीट लक्षात घ्या आणि गा."
"रफी खजील झाले. माफी मागत म्हणाले – मला माफ करा. पण हे गाणं काही माझ्या डोक्यात काही बसत नाहीये. मी आता पुन्हा प्रयत्न करतो. रफींनी ते गाणं संगीत दिग्दर्शकाला पसंत पडेपर्यंत पुन्हा पुन्हा गायलं. नंतर ते साथसंगत करणाऱ्या वादकांकडे गेले. सगळ्यांची माफी मागितली. याच विनम्रतेमुळे ते सगळ्यांचे लाडके होते."
चीनमध्येही वाजली रफींची गाणी
मोहम्मद रफींच्या गाण्यांची लोकप्रियता किती होती याची पावती एका माजी सैनिकाने सांगितलेल्या किस्स्यातून मिळते. 2020 मध्ये इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलेला हा किस्सा.
1962 च्या युद्धात रणांगणावर असणारे भारतीय सैनिक फुनशोक ताशी यांनी याविषयी सांगितलं आहे. "गलवान क्षेत्रात भारत आणि चीन दरम्यान चकमकी सुरू होत्या. चिनी सैनिकांनी त्यांच्या सीमेपाशी तेव्हा मोठमोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर हिंदीत घोषणा द्यायला सुरुवात केली – ही भूमी तुमची नाही, आमची आहे. तुम्ही परत जा म्हणजे आम्हीही माघार घेऊ. या हिंदीतल्या घोषणेनंतर ते मोहम्मद रफींचं गाणं लावत – 'तुमसा नही देखा' आणि तेही मोठ्या आवाजात. त्याबरोबर लता मंगेशकरांचं 'तन डोले...' लावलं जाई. किती तरी दिवस चिनी सैनिक अशी गाणी लावत. भारतीय सैनिकांनी मागे हटावं यासाठी त्यांचे हे सगळे प्रयत्न सुरू होते. पण भारतीय जवान इंचभरही मागे हटले नाहीत."
लाहोरशी नातं आणि केस कापायचं काम
आता काही गोष्टी मोहम्मद रफींच्या बालपणाविषयी. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी अमृतसरजवळच्या कोटला सुलतान सिंह मध्ये झाला. अल्लाह राखी आणि हाजी अली मोहम्मद यांचं हे बाळ. प्रेमाने बाळाला फीको असं म्हणत.
हाजी अली मोहम्मद एक उत्तम आचारी होते. 1926 मध्ये ते कामानिमित्त लाहोरला निघून गेले. फीको कोटला सुलतान सिंहच्या शाळेत शिकत होता तेव्हा.
बाराव्या वर्षी फीको उर्फ रफी इतर कुटुंबियांबरोबर लाहोरला गेले. त्यानंतर त्यांची शाळा बंदच झाली. त्यांनी आपल्या मोठ्या भावाबरोबर केस कापायचा व्यवसाय सुरू केला.
रफीला लहानपणापासूनच संगीताविषयी प्रचंड प्रेम होतं. वडिलांचा संगीताला विरोध होता. म्हणून ते त्यांच्या गुपचूप गायचे. त्यांच्या लहानपणचा एक किस्सा बराच प्रसिद्ध आहे. एकदा लाहोरमध्ये असताना एकतारा वाजवत एक फकीर त्यांच्या घरापाशी आला होता. त्याचं गाणं ऐकत ऐकत रफी बेभानपणे त्याच्या मागे मागे चालत राहिले. रफी अनेकदा हजरत दाता गंद बख्त यांच्या दर्ग्याला जायचे.

एकदा लाहोरच्या ऑल इंडिया रेडिओचे अधिकारी जीवनलाल मट्टो नूर मोहल्ला भागातून जात होते. तेव्हा त्यांच्या कानावर एक अत्यंत सुरेल तान पडली. ते गाणं ऐकत राहिले. आवाजात खरंच जादू होती. आवाजाचा माग घेत ते एका दुकानापाशी आले. तिथे रफी केस कापत होते. रफीच्या गायनावर फिदा होत त्या अधिकाऱ्यांनी रफीला रेडिओसाठी काम करण्याची संधी देऊ केली.
आणखी एक लाहोरचा किस्सा. प्रसिद्ध गायक के. एल. सहगल यांच्या एका कार्यक्रमात एकदा अचानक बत्ती गुल झाली. मधला वेळ काढण्यासाठी तरुण मोहम्मद रफी यांना मंचावर नेण्यात आलं. रफीने जे गायलं ते ऐकून प्रेक्षकात बसलेले संगीतकार श्यामसुंदर चकित झाले. त्यांनी तरुण रफीला थेट मुंबईत येण्याचा सल्ला दिला.

या बातम्याही वाचा:

'रफी गात राहिले आणि रक्त वाहत राहिलं'
एक वडील सोडले तर मोहम्मद रफींच्या घरातले इतर सदस्य त्यांच्यामधील कलेला ओळखून होते. रफीचं भविष्य मुंबईत आहे, हे त्यांनाही जाणवलं. मग रफी मुंबईत आले. त्यानंतर स्ट्रगल सुरू झाला. लाहोरमध्ये रफीचं गाणं ऐकून खूश झालेले संगीतकार श्यामसुंदर यांनी पंजाबी चित्रपट 'गुलबलोच'मध्ये रफीला गायची संधी दिली.
सुरुवातीच्या काळात सन 1944 चा चित्रपट 'पहले आप' आणि नंतक 'गाँव की गोरी' मध्ये त्यांना गायची संधी मिळाली. त्यातल्या 'पहले आप'मध्ये त्यांना कोरसमध्ये गायचं होतं. गाणं असं होतं की सैनिकांच्या कदमतालाच्या आवाजासारखं गायकांनाही कदमताल करावा लागणार होता.
रेकॉर्डिंगनंतर संगीतकार नौशाद यांनी पाहिलं की रफी यांच्या पायातून रक्त येत होतं. त्याबद्दल विचारलं तेव्हा मोहम्मद रफींनी सांगितलं की, त्यांचे बूट खूप घट्ट होते आणि गाणं सुरू असल्याने त्यांनी काहीच सांगितलं नाही. तसंच गात राहिले.
मोहम्मद रफींची लोकप्रियता आणि यशाची गोष्ट संगीतकार नौशाद यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. या दोघांनी 'बैजू बावरा', 'कोहिनूर', 'मदर इंडिया', 'मुग़ले-ए-आज़म', 'आन', 'गंगा जमुना', 'मेरे महबूब', 'राम और श्याम', 'पाकीज़ा' अशा चित्रपटांसाठी एकत्र काम केलं.
नौशाद यांचा मुलगा राजू नौशाद यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार, "नौशाद मोहम्मद रफींकडून तासन तास रियाज करून घ्यायचे. आणि रफीसुद्धा बैठक न सोडता सराव करत राहायचे. तेव्हा नौशाद त्यांना हसून सांगत की - जा आता दुसऱ्या गाण्यांचीही प्रॅक्टिस कर. नाहीतर तू कधीच श्रीमंत होऊ शकणार नाहीस."
या दोघांच्यातलं नातं संगीताच्याही पलीकडचं होतं. रफी साहेबांच्या मुलींचा निकाहसुद्धा नौशादजींनी लावला होता.
रफींना जेव्हा रीटेक घ्यायला सांगितलं गेलं...
विनम्र आणि आदबशीर असलेल्या मोहम्मद रफी कधीच नाराज व्हायचे नाहीत, असं मात्र नव्हतं. पण त्यातही त्यांचा अंदाज वेगळा असायचा.
'मोहम्मद रफी – अ गोल्डन व्हॉइस' या पुस्तकात ज्येष्ठ संगीतकार ओमी यांनी यासंबंधीची एक आठवण सांगितली आहे. ते सांगतात, "एकदा रफी माझ्यावर नाराज झाले. ते क्वचितच नाराज व्हायचे. पण 1973 च्या धर्मा फिल्मच्या गाण्यादरम्यान असं एकदा झालं. 'राज़ की बात कह दूँ तो...'या कव्वालीचं रेकॉर्डिंग सुरू होतं. मला रिटेक घ्यायचा होता. रफींची फार इच्छा नव्हती. त्यावरून ते नाराज होत म्हणाले – काय म्हणायचंय तुम्हाला? रफींकडून असं वक्तव्य अनपेक्षित होतं. मीसुद्धा थोडा कडकपणा दाखवत म्हटलं – ठीक आहे मग – पॅक अप. रफी साहेब एका शब्दाने काही न बोलता निघून गेले. "

फोटो स्रोत, MOHAN CHURIWALA
"दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता घराची बेल वाजली. माझ्यासमोर रफी साहेब उभे होते. ते पंजाबीत म्हणाले – मी तुला काल नाराज केलं खरं. चल कालची कव्वाली ऐकूया एकदा. मी अमेरिकेतून हा स्पीकर आणलाय. चल यावरच ऐकू या. ऐकून झाल्यावर रफी साहेबांनी अगदी विनम्रतेने विचारलं – मग, दुसऱ्यांदा रेकॉर्ड करायचंय का");