के. चंद्रशेखर रावः आजवर 14 निवडणुका लढवल्या, एकदाच हरले, तेही त्यांच्या 'या' गुरूकडून

फोटो स्रोत, CMO TELANGANA / UGC
- Author, अरुण सांडिल्य
- Role, प्रतिनिधी, बीबीसी तेलुगू
- Twitter,
ते वर्ष होतं 1983. संयुक्त आंध्र प्रदेश राज्यातील विधानसभेच्या 294 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीनंतर चर्चेचं केंद्र बनलेल्या सिद्दीपेट मतदारसंघही त्यापैकीच एक.
मेडक जिल्ह्यातील सिद्दीपेट मतदारसंघातून काँग्रेसचे तत्कालीन विद्यमान आमदार अनंतुला मदन मोहन यांना पक्षानं पुन्हा उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात भाजपकडून निम्मा नरसिम्हारेड्डी यांनी निवडणूक लढवली होती.
काही महिन्यांपूर्वी नंदामुरी तारका रामाराव (एनटीआर) यांनी स्थापन केलेल्या तेलगू देसम पक्षानेही (टीडीपी) सिद्दपेटमधून आपला उमेदवार उभा केला होता.
तेलगू देसम पक्ष जसा नवीन होता, तसाच सिद्दीपेटमधील त्यांचा उमेदवारही नवीन होता. या उमेदवाराची राज्यव्यापी निवडणुकीतली ही पहिलीच वेळ होती. या नवख्या उमेदवाराचं नाव होतं - कलवकुंतला चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर.
केसीआर पुढे जाऊन स्वतंत्र तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले, पुन्हा निवडणुका झाल्यावर पुन्हा मुख्यमंत्री बनले आणि आता ते मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रिक लगावण्याच्या आशेत तयारीला लागलेत.
आता पुन्हा जाऊ त्यांच्या 1983 च्या त्या पहिल्या निवडणुकीत.
तर अनंतुला मदन मोहन हे सिद्दीपेट मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर तीनदा आमदार म्हणून विजयी झाले होते. 1983 ची निवडणूक ही त्यांची चौथी विधानसभा निवडणूक होती.
त्यावेळी सिद्दपेट मतदारसंघात 65.01 टक्के मतदान झालं आणि त्यात एकूण 1 लाख 12 हजार 576 मतदार होते. मात्र, प्रत्यक्ष मतदान 73 हजार 189 मतदान झालं. त्यापैकी काँग्रेसचे उमेदवार अनंतुला मदन मोहन यांना 28 हजार 766 मतं मिळाली.
केसीआर यांनी टीडीपीकडून निवडणूक लढवली आणि त्यांना 27 हजार 889 मतं मिळाली, तर भाजपच्या उमेदवार निम्मा नरसिम्हारेड्डी यांना 13 हजार 358 मतं मिळाली.
अनंततुला मदन मोहन हे विजयी झाले. त्यांनी केसीआर यांचा 887 मतांनी पराभव केला.
पुढच्या दोन्ही निवडणुकीत पहिल्या पराभवाचा काढला वचपा
केसीआर यांची ही पहिलीच निवडणूक होती. पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर केसीआर पुन्हा हरले नाहीत. तेव्हापासून ते विधीमंडळ आणि लोकसभा मिळून सलग 13 वेळा निवडून आले आहेत.
या 13 निवडणुकांपैकी 8 वेळा विधानसभेवर आणि 5 वेळा लोकसभेवर निवडून आले. त्यांनी एकूण 14 निवडणुका लढवल्या आहेत. फक्त पहिल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

फोटो स्रोत, FACEBOOK/KCR
ज्या अनंतुला मदन मोहन यांनी केसीआर यांना पहिल्या निवडणुकीत पराभूत केलं, त्या अनंतुला मदन मोहन यांना पुढच्या दोन्ही निवडणुकीत केसीआर यांनी पराभूत केल. 1989 आणि 1994 च्या विधानसभा निवडणुकीत अनंतुला मदन मोहन यांचा सिद्दीपेट मतदारसंघात केसीआर यांच्याकडून पराभव झाला होता.
केसीआर यांचा पराभव करणारे अनंतुला मदन मोहन कोण होते?
अनंतुला मदन मोहन यांना केसीआरचे राजकीय गुरू म्हटलं जातं. वकिलीसोबतच मदन मोहन तेलंगणा चळवळ आणि राजकारणातही सक्रिय होते.
विद्यार्थी जीवनापासून राजकारणात प्रवेश करण्याच्या सुरुवातीच्या दिवसांपर्यंत आणि काँग्रेसमधील काळात केसीआर हे अनंतुला मदन मोहन यांच्या जवळचे होते.
एनटीआर यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केल्यानंतर, केसीआर त्यात सामील झाले आणि त्यांनी सिद्दीपेटमध्ये अनंतुला यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली.
अनंतुला मदन मोहन यांनी 1970 च्या सिद्दपेट पोटनिवडणुकीपासून विधानसभेत प्रवेश केला होता.

फोटो स्रोत, UGC
1967 मध्ये सिद्दीपेटमधून विजयी झालेल्या वल्लुरी बसवराजू यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला आणि ही जागा रिक्त झाली.
1970 मध्ये सिद्दीपेट विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत अनंतुला मदन मोहन यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, तर पीव्ही राजेश्वर राव यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती.
अनंतुला यांनी 31 हजार 633 मते मिळवून विजय मिळवला. नंतर अनंतुला मदन मोहन यांनी 1972 आणि 1979 च्या निवडणुका जिंकल्या. 1983 मध्ये त्यांनी केसीआरविरुद्ध विजय मिळवला.
त्यांनी पीव्ही नरसिंह राव, मेरी चेन्ना रेड्डी, भवनाल वेंकटरामी रेड्डी, टंगुतुरी अंजय्या आणि कोटला विजयभास्कर रेड्डी यांच्या मंत्रिमडळात काम केलं. ते महसूल, आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री राहिले आहेत.
1983 च्या निवडणुकीत तेलगू देसम पक्षानं 200 हून अधिक जागा जिंकल्या आणि NTR सोबत मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन केलं, तर अनंतुला मदन मोहन विधानसभेतील मुख्य विरोधी पक्षनेते होते.
1985 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही. 1989 आणि 1994 च्या निवडणुकीत त्यांनी सिद्दीपेटमध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि दोन्ही वेळा केसीआर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
यानंतर ते हळूहळू राजकीय क्षितिजावरून दूर सरत गेले आणि कालांतरानं राजकीय वर्तुळातून पूर्णपणे बाहेर पडले. 2004 मध्ये त्यांचं निधन झालं.
केसीआर यांच्या आधीचं तेलंगणा आंदोलन
केसीआर यांनी 2001 साली वेगळ्या तेलंगणा राज्याची मागणी करत वेगळा तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्ष काढला. पण त्यांचे राजकीय गुरू असलेल्या अनंतुला मदन मोहन यांनी 70 च्या दशकात वेगळ्या राज्याची मागणी केली होती.
1969 मध्ये अनंतुला मदन मोहन यांनी केशवराव जाधव यांच्यासोबत तेलंगणा प्रजा समितीची स्थापना केली होती. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. मात्र, काही महिन्यांतच त्यांना पीडी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. त्यानंतर नेतृत्व बदललं.
1969 च्या उत्तरार्धात वेगळ्या तेलंगणासाठी आंदोलन करणाऱ्या मेरी चेन्ना रेड्डी यांनी तेलंगण प्रजा समितीही ताब्यात घेतली.
1971 मध्ये संसदीय पोटनिवडणुकीत तेलंगणा प्रजा समितीचे 10 उमेदवार विजयी झाले होते.
तेलंगणा प्रजा समितीचे उमेदवार नागरकुर्नूल (SC), महबूबनगर, हैदराबाद, सिकंदराबाद, सिद्दपेट (SC), मेडक, पेड्डापल्ली (SC), करीमनगर, वारंगल आणि नलगोंडा लोकसभा मतदारसंघात विजयी झाले.
त्या निवडणुकीत तेलंगणा प्रजा समितीचे खासदार म्हणून विजयी झालेले जी. व्यंकटस्वामी आणि एम. सत्यनारायण राव (एमएम) यांनी आंध्र प्रदेशच्या राजकारणात दीर्घकाळ काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.

फोटो स्रोत, RAJASTHAN RAJ BHAVAN
केसीआर यांनी 2001 साली वेगळ्या तेलंगणा राज्याची मागणी करत वेगळा तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्ष काढला. पण त्यांचे राजकीय गुरू असलेल्या अनंतुला मदन मोहन यांनी 70 च्या दशकात वेगळ्या राज्याची मागणी केली होती.
1969 मध्ये अनंतुला मदन मोहन यांनी केशवराव जाधव यांच्यासोबत तेलंगणा प्रजा समितीची स्थापना केली होती. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. मात्र, काही महिन्यांतच त्यांना पीडी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. त्यानंतर नेतृत्व बदललं.
1969 च्या उत्तरार्धात वेगळ्या तेलंगणासाठी आंदोलन करणाऱ्या मेरी चेन्ना रेड्डी यांनी तेलंगण प्रजा समितीही ताब्यात घेतली.
1971 मध्ये संसदीय पोटनिवडणुकीत तेलंगणा प्रजा समितीचे 10 उमेदवार विजयी झाले होते.
तेलंगणा प्रजा समितीचे उमेदवार नागरकुर्नूल (SC), महबूबनगर, हैदराबाद, सिकंदराबाद, सिद्दपेट (SC), मेडक, पेड्डापल्ली (SC), करीमनगर, वारंगल आणि नलगोंडा लोकसभा मतदारसंघात विजयी झाले.
त्या निवडणुकीत तेलंगणा प्रजा समितीचे खासदार म्हणून विजयी झालेले जी. व्यंकटस्वामी आणि एम. सत्यनारायण राव (एमएम) यांनी आंध्र प्रदेशच्या राजकारणात दीर्घकाळ काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.
केसीआर यांचा मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास
1983 साली विधानसभा निवडणुकीत आपले राजकीय गुरु अनंतुला मदन मोहन यांच्याकडून केसीआर यांना पराभव पत्कारावा लागला खरा, पण त्यानंतर केसीआर यांनी मागे वळून पाहिलं नाही. आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्षाच्या एनटी रामाराव आणि चंद्राबाबू यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केलं.
केसीआर यांनी वेगळ्या तेलंगणा राज्याची मागणी करत तेलगू देसम पक्ष सोडला आणि 2001 मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीची (टीआरएस) स्थापना केली.
2004 च्या निवडणुकीत केसीआर यांनी टीआरएस उमेदवार म्हणून सिद्दीपेट विधानसभा मतदारसंघ आणि करीमनगर लोकसभा मतदारसंघात विजय संपादन केला होता. त्यांनी खासदारकी कायम ठेवून आमदरकी सोडली.
या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली होती. म्हणून केंद्रीय मंत्री म्हणून त्यांचा मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये समावेस झाला. पण वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मागणीबाबत काँग्रेसकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यानं त्यांनी 2006 साली केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
मनमोहन सिंग सरकारमधून बाहेर पडले आणि त्यांच्या राजकीय भूमिकेमुळं वेगळ्या तेलंगणा राज्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली.

फोटो स्रोत, FACEBOOK/KCR
नोव्हेंबर 2009 मध्ये, त्यांनी संसदेत वेगळ्या तेलंगणा राज्याचं विधेयक सादर करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं. त्यांचं उपोषण सुरू केल्यानंतर 11 दिवसांनी केंद्र सरकारनं तेलंगणाला वेगळं राज्य म्हणून होकार दिला.
त्यानंतर 2014 साली नव्यान स्थापन झालेल्या तेलंगणा राज्याची पहिली विधानसभा निवडणूक झाली. यात 119 विधानसभेच्या जागांपैकी त्यांच्या टीआरएस पक्षानं 63 जागा मिळावल्या. आणि 2 जून 2014 रोजी तेलंगण राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून केसीआर यांनी शपथ घेतली.
5 ऑक्टोबर 2022 रोजी, विजयादशमीच्या दिवशी, केसीआर यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत त्यांच्या पक्षाचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती असं ठेवलं. आणि राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करत देशभरात त्यांच्या पक्षाच्या विस्ताराची घोषणा केली.
केसीआर यांचा 1985 पासून अपराजित नेते म्हणून राजकीय प्रवास सुरु आहे तर ते सलग दोन वेळा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांचा हा मुख्यमंत्री पदाचा दुसरा कार्यकाळ सुरु आहे. आणि आता ते मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रिक साधण्यासाठी प्रयत्न करताना दिसतायेत.