इलॉन मस्क 'हाय-प्रोफाइल' कार्यक्रमांमध्ये आपल्या मुलांना एवढी 'स्पेस' का देतात?

ट्रम्प प्रशासनात सहभागी होण्याआधीही इलॉन मस्क हे अनेक प्रसंगी मुलांसोबत दिसले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रम्प प्रशासनात सहभागी होण्याआधीही इलॉन मस्क हे अनेक प्रसंगी मुलांसोबत दिसले आहेत.
  • Author, रचेल लुकर और लिली जमाली
  • Role, बीबीसी न्यूज

इलॉन मस्क, जगभरात सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असलेले उद्योजक आहेत. देशोदेशींच्या व्हीव्हीआयपी कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहज वावर असतो. आपल्या मुलांमुळं मस्क पुन्हा चर्चेत आले आहेत.

इलॉन मस्क यांची मुलं अशा ठिकाणी गेली आहेत, जिथं अनेक लोक कधीच पोहोचू शकणार नाहीत.

परदेशी नेत्यांच्या भेटीपासून ते स्पेसएक्स (SpaceX) लाँचच्या कंट्रोल रुमपर्यंत, मस्क यांची मुलं सतत त्यांच्यासोबत तंत्रज्ञान, व्यवसाय आणि आता राजकीय व्यासपीठावर दिसत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हापासून टेक अब्जाधीश आणि टेस्लाच्या या सह-संस्थापकांकडे नवीन सरकारी विभाग डीओजीईचे (Department Government Efficiency) नेतृत्त्व सोपवले आहे, तेव्हापासून मस्क सातत्त्यानं देशाच्या राजधानीत दिसत आहेत.

मस्क यांचा चार वर्षांचा मुलगा 'लिटिल एक्स' बुधवारी (12 फेब्रुवारी) ओव्हल कार्यालयात कॉलर असलेला शर्ट आणि कोट परिधान करुन रेसोल्यूट डेस्कच्या कोपऱ्यात उभा होता.

गुरुवारी (13 फेब्रुवारी) जेव्हा मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन या विषयावर चर्चा करत होते. त्यावेळी 'लिटिल एक्स' आणि त्याच्या आणखी दोन भाऊ-बहिणींनी पंतप्रधानांसमवेत भेटवस्तूची देवाण-घेवाण केली.

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनात सहभागी होण्यापूर्वीही मस्क यांना अनेकदा त्यांच्या मुलांसोबत पाहिले गेलं आहे.

ऑशविट्झ कॅम्प स्मारकासंदर्भातील एका कार्यक्रमात आणि 2021 मध्ये मस्क यांना 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून सन्मानित करणाऱ्या टाइम मासिकाच्या समारंभात त्याचबरोबर तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत झालेल्या भेटीवेळीही त्यांची मुलं त्यांच्याबरोबर होती.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी मस्क आपल्या मुलांना का घेऊन जातात?

अमेरिकन विद्यापीठातील पब्लिक कम्युनिकेशनचे प्रोफेसर कर्ट ब्रेडॉक म्हणतात, "सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मुलांचा समावेश करणं हे राजकारणी व्यक्तीनं उचलेलं राजकीय पाऊल आहे, असं म्हणता येईल.

आपली मुलं इतरांबरोबर मिसळावीत आणि लोकांच्या नजरेत त्यांच्याबद्दल एक मानवी दृष्टीकोन तयार व्हावा असं त्यांना वाटत असतं."

सार्वजनिक ठिकाणी मुलं सोबत का?

तरीही, ब्रेडॉक यांच्या मते, मस्क यांनी आपल्या लहान मुलाला ओव्हल कार्यालयात नेण्याचा निर्णय असामान्य होता.

30 मिनिटांच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये 'लिटिल एक्स' कंटाळलेला दिसला. तो कधी आपल्या वडिलांची नक्कल करताना दिसला, कधी तो जमिनीवर बसला होता तर कधी तो अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे एकटक पाहत हसत होता.

ब्रेडॉक म्हणाले की, मुलांना जाणूनबुजून अशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नेलं जातं. अशा ठिकाणी उपस्थितांना विचलित करणं हा उद्देश असू शकतो. मस्क आणि ट्रम्प या दोघांसाठी ते फायदेशीर आहे.

ते म्हणाले, "मला वाटतं की, यामागं एक रणनीती आहे. या माध्यमातून काही गोष्टींकडे लक्ष वेधून आणि इतर गोष्टींपासून लक्ष वळण्याचा प्रयत्न केला जात आहे."

ओव्हल कार्यालयामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करताना मस्क त्यांच्या मुलासोबत दिसले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ओव्हल कार्यालयामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करताना मस्क त्यांच्या मुलासोबत दिसले होते.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जॉन हेबर हे एक स्ट्रॅटजिक कम्युनिकेशन सल्लागार आहेत. त्यांनी पाच राष्ट्राध्यक्षपदांच्या निवडणूक मोहिमांवर काम केलं आहे. ते सध्या हॉर्वर्ड विद्यापीठात शिकवतात.

ते म्हणतात की, मस्क यांच्या मुलांना वारंवार दाखवणं आणि ते क्षण व्हायरल होणं हे ट्रम्प यांच्यासाठी फायदेशीर आहे.

हेबर म्हणाले, "शक्य तितका जास्त गोंधळ दाखवणं हे ट्रम्प यांच्यासाठी फायदेशीर आहे. यामुळं त्यांच्याकडे कमी लक्ष दिलं जातं."

मस्क यांची पूर्व प्रेयसी आणि 'लिटिल एक्स'ची आई ग्रिम्स यांनी ओव्हल कार्यालयातील आपल्या मुलाच्या उपस्थितीवर टीका केली आहे.

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिलं की, आपल्या मुलाला अशा पद्धतीनं सार्वजनिकरित्या समोर आणलं जाऊ नये. परंतु, मला आनंद आहे की, या दरम्यान तो खूप विनम्र होता.

वर्ष 2022 मध्ये ग्रिम्स यांनी व्हॅनिटी फेअरसाठी लिहिलेल्या लेखात आपल्या मुलाला चर्चेत ठेवणं पसंत नसल्याचं, म्हटलं होतं.

त्यांनी लिहिलं की, "कुटुंबात जे काही चाललं आहे, मला वाटतं की मुलांना त्यापासून दूर ठेवलं पाहिजं आणि अशाच वेळी एक्स तिथं आहे. मुळात ते त्याला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून पाहत आहेत आणि त्याला सर्वत्र घेऊन जात आहेत."

मस्क आणि त्यांची मुलं

राजकारणात येण्यापूर्वीपासूनच मस्क यांनी आपल्या मुलांबरोबर फिरायला जायला सुरुवात केली होती.

एका दशकापूर्वी, जेव्हा ते आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाकडं लक्ष वेधण्यासाठी ते उत्सुक होते. त्यावेळी अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना पाहणं सामान्य होतं.

वर्ष 2015 मध्ये जेव्हा विश्लेषक आणि पत्रकार सिलिकॉन व्हॅलीत टेस्ला सुरु होण्याची वाट पाहत होते. त्यावेळी मस्क यांची पाच मुलं कंपनीच्या परिसरात एकमेकांमागं पळताना, हसताना, ओरडताना दिसायची.

तिथं उपस्थित लोकांना अनेक तास वाट पाहावी लागली, परंतु मस्क यांच्या मुलांच्या उपस्थितीनं तिथलं वातावरण एकदम आनंदमय झालं होतं.

साधारणपणे कंपन्यांद्वारे आयोजित केलेले कार्यक्रम कठोर शिस्तीत आणि औपचारिक वातावरणात पार पडत असतात. परंतु, हा कार्यक्रम अगदी वेगळा होता. तिथं कंपनीप्रमुखाच्या लहान मुलांना पाहणं अगदी अद्भुत असं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान इलॉन मस्क आपल्या कुटुंबीयांबरोबर.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान इलॉन मस्क आपल्या कुटुंबीयांबरोबर.

मस्क यांना तीन वेगवेगळ्या महिला जोडीदारांपासून 12 मुलं आहेत.

त्यांच्या ज्या लहान मुलांना सार्वजनिक ठिकाणी पाहिलं जातं, त्यात एक्स, एई, ए-12 आणि 'लिटिल एक्स' यांचा समावेश असतो.

स्वत: मस्क यांनी आपल्या चार वर्षाच्या मुलाचं वर्णन 'भावनिक आधार' देणारा असं केलं आहे.

मस्क आपल्या मुलांमध्ये खूप गुंतलेले आहेत. त्यांच्याप्रती ते वचनबद्ध आहेत. आपल्या मुलांसाठी ते जवळपास वेडेच आहेत, असं मस्क यांचं चरित्र लिहिणारे वॉल्टर आयझॅकसन यांनी 'द डायरी ऑफ अ सीईओ' या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे.

आयझॅकसन म्हणाले की, "ते त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या प्रेयसीसाठी, पत्नीसाठी जे काही करतात, ते पूर्णपणे समर्पित होऊन करतात."

"आपली मुलं आपल्या आजूबाजूला राहावीत, असं त्यांना वाटत असतं. त्यांना नेहमीच बरोबर एक सोबती हवा असतो, पण याचा अर्थ असा नाही की त्यांना शांतता आवडत नाही," असंही आयझॅकसन यांनी सांगितलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.