CAA आणि बॉलिवुड: आयुषमान खुराना, रितेश देशमुख, रेणुका शहाणे यांच्यासह अनेकांचे ट्वीट

फोटो स्रोत, Twitter @NarendraModi
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि त्यावरून दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराविरोधात देशभर आंदोलनं होताना दिसत आहेत. त्याचे पडसाद फिल्म इंडस्ट्रीमध्येही उमटले आहेत.
अभिनेता रितेश देशमुखनं सोशल मीडियावर एका निवेदनाद्वारे आपण शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचं म्हटलं आहे. "आपला देश महान आहे, कारण इथे प्रत्येकाचा आवाज ऐकला जातो, मग ती एक व्यक्ती असो किंवा हजारो लोक."

फोटो स्रोत, Twitter @RiteshD
"मी कुठल्याच हिंसाचाराचं समर्थन करत नाही. आमच्या पोलीस दलाचा आम्हाला अभिमान होता आणि आहे. पण त्यांनी या परिस्थितीत थोडी सावधगिरी बाळगून, करुणा दाखवून काम करायला हवं होतं. आपल्या विद्यार्थ्यांबरोबर अशी वागणूक योग्य नाही."
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्वीटवर दिलेली प्रतिक्रिया अनेक कलाकारांसह हजारो लोकांनी रिट्वीट केली आहे.
मोदींनी सर्वांना शांतता राखण्याचं आणि अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर रेणुका यांनी म्हटलं आहे, की "सर, तुम्ही कृपया तुमच्या IT सेलचे ट्विटर हँडल चालवणाऱ्यांनाही त्यापासून दूर राहायला सांगा. ते सर्वाधिक अफवा आणि गैरसमज पसरवत असतात, जे बंधुभाव, शांतता आणि एकात्मतेच्या विरोधात आहे. तुमचा IT सेल खरी 'तुकडे-तुकडे गँग' आहे. त्यांना द्वेष पसरवण्यापासून थांबवा."

फोटो स्रोत, Twitter / @Renukash
स्वतःला आलेल्या अनुभवांतून हे विधान केल्याचं रेणुका यांनी बीबीसी मराठीच्या जान्हवी मुळे यांच्याशी बोलताना सांगितलं. तसंच अशी आंदोलनं दडपण्याचा प्रकार नेहमीच होत असतो, याकडे लक्ष वेधलं आहे.
"2012 सालीही आपण अशाच गोष्टी पाहिल्या होत्या. फार पाठी जायला नको. शांततापूर्ण आंदोलनाविरुद्ध हिंसा वापरणं ही खूप पूर्वीपासून सत्ताधाऱ्यांची भूमिका राहिली आहे. पोलिसांवर टीका होतीये, पण ते अनेकदा फक्त आदेशाचं पालन करत असतात. तो आदेश कोण देतं? कुठल्याही पक्षाचं सरकार असो, ते अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देताना दिसलं आहे. आंदोलन करताना कुणालाही तो धोका स्वीकारावा लागतोच."
आंदोलनात कलाकारांचा सहभाग
या आंदोलनाबाबत कुठलाही मोठा स्टार का बोलत नाहीये, असा प्रश्न सर्वत्र विचारला जातो आहे. यावरूनच मंगळवारी संध्याकाळी ट्विटरवर #ShameOnBollywood असा ट्रेंड होता.
पंतप्रधान मोदींनी सिनेकलाकारांसोबत घेतलेला एक जुना सेल्फी अभिनेत्री शायोनी गुप्ता हिने ट्वीट करत कलाकारांना बोलण्याचं आवाहन केलं आहे.
"जामिया आणि अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या वतीने मी विनंती करते, की तुमच्यापैकी किमान एकाने तरी पोलिसांच्या अत्याचाराविरोधात, विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराविरोधात बोलायला हवं. बोलण्याची हीच वेळ आहे - हो? नाही? कदाचित");