कॅन्सर शरीरात कसा पसरतो ते एकूण प्रकार किती, जाणून घ्या सर्वकाही

कॅन्सर

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, डॉ. दिलीप निकम
  • Role, कॅन्सरतज्ज्ञ, बॉम्बे हॉस्पिटल
  • Reporting from मुंबई

'कॅन्सर' रोगाचे नाव जरी ऐकले तरी पोटात भीतीचा गोळा उठतो. किंबहुना, निराशा, वैफल्य आणि अगतिकता या भावना केवळ रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईकांनाच नव्हे, तर डॉक्टर आणि संशोधकांना सुद्धा ग्रासतात.

कॅन्सर या शब्दाचा इतिहास पाहिल्यास अगदी ग्रीक किंवा रोमन पुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो.

ख्रिस्त जन्म पूर्व 470 ते 370 च्या दरम्यान ग्रीक औषधशास्त्राचे जनक हिपोक्रॅट्स ने कॅन्सरचा उल्लेख करताना कार्सिनोस किंवा कार्सिनोमा या शब्दांचा उल्लेख पहिल्यांदा केला. कार्कीनोस (Karkinos) या शब्दाचा ग्रीक अर्थ म्हणजे (क्रॅब ) खेकडा, बरेच कॅन्सर रुग्ण तपासल्यावर त्याच्या लक्षात आले की, रुग्णांमध्ये कडक गाठी आहेत.

तसंच, त्या एका ठिकाणावरून दुसरीकडे पसरत जातात आणि शेवटच्या टप्प्यात दुखणेही असह्य असते. खेकड्याची कडक पाठ आणि नांगी चावल्यानंतरची असह्य वेदना या साम्यधर्मामुळे कॅन्सरला खेकड्याची उपमा दिली गेली.

गलान या ग्रीक फिजिशियनने ऑनकॉस हा शब्द प्रचिलित केला. ग्रीकमध्ये ओंकॉस म्हणजे सूज.

रोमन फिजिशियन सेल्सस यांनी मात्र पहिल्यांदा 'कॅन्सर' शब्दप्रयोग केला. कारण खेकड्याला लॅटिनमध्ये कॅन्सर म्हटले जाते. यातूनच या रोगाला कॅन्सर हे नाव प्रचिलित झाले.

त्या काळी कॅन्सरचे निदान करणे अतिशय अवघड होते. तसंच, कॅन्सर म्हणजे कुठलातरी रहस्यमय आणि कधीही बरा न होणारा रोग म्हणून पाहिला गेला.

कॅन्सरबद्दल खऱ्या अर्थाने संशोधन सतराव्या शतकात मायक्रोस्कोपचा शोध लागल्यानंतरच सुरू झालं. कॅन्सरपेशींची तपासणी करून पेशींमधले बदलाचे अभ्यास सुरू झाले.

एकोणिसाव्या शतकात वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली, तशी खऱ्या अर्थाने कॅन्सरचे गूढ उलगडण्यास सुरुवात झाली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

कॅन्सरची शरीरात नेमकी सुरुवात कशी होते? त्याची वाढ कशी होते? शरीरात इतर ठिकाणी कसा पसरतो? या सगळ्याची झालेली उकल ही आतापर्यंतच्या संशोधनातील अतिशय महत्वाचे संशोधन मानले जाते. कारण कॅन्सरबाबत आतापर्यंतच्या सर्व भ्रामक समजुतींना तडा दिला तो याच संशोधनाने.

कॅन्सरबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण शरीररचनेबद्दल माहिती घेणं आवश्यक आहे. कारण मानवी शरीर हे ट्रीलिअन्स पेशींनी बनलेले असून त्यातील वेगवेगळ्या मांसपेशी मिळून अवयव बनतात.

कॅन्सर

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नवीन नॉर्मल पेशी तयार करणे, त्यांची योग्य ती वाढ करून नेमून दिलेले कार्य करून घेणे आणि कार्य संपल्यानंतर जुन्या झालेल्या पेशींना मारून, तिथे नवीन पेशी बनविणे ही सर्व प्रक्रिया आपल्या नकळत शरीरात सुरू असते. हे सर्व पेशींमधील असणारी जनुकं (Genes) अतिशय काटेकोरपणे नियंत्रित करीत असतात. त्यामुळेच आपण निरोगी राहतो.

समजा कार्सिनोजेन एक्सपोजर, इन्फेक्शन, विषाणू बाधा, अनुवंवशीकता इत्यादी कारणांनी या जनुकांमध्ये बदल (Mutations) झाल्यास वरील नियंत्रण सुटते आणि पेशींची असंबद्ध वाढ होऊन पेशींच्या आकारात, स्वभावात फरक पडतो आणि ह्या प्रक्रियेलाच कॅन्सर म्हटले जाते.

नॉर्मल पेशींच्या तुलनेत कॅन्सर पेशी कमी प्रगल्भ असतात, तसंच त्यांची अनियंत्रित वाढीची क्षमता वाढते. शरीरातील इम्युन सिस्टीमला न जुमाणने आणि एके ठिकाणावरून निघून दुसऱ्या ठिकाणच्या पेशी किंवा अवयवामध्ये पसरून त्याना इजा करणे इत्यादी सारखे स्वतः मध्ये बदल घडवून कॅन्सर पेशी अमरत्व मिळवतात. त्यामुळे त्यांचा नायनाट करणे कठीण असते.

तसंच, शरीरात होणारी प्रत्येक गाठ ही कॅन्सरचीच असते असे नाही, तर ती साधी ही गाठ असू शकते जसे थायरॉईड गॉईटर.

कॅन्सरची गाठ ओळ्खण्याचा सोपा उपाय म्हणजे साधी गाठ एका ठिकाणावरून दुसरीकडे कधीही पसरत नाही तर कॅन्सरची गाठ शरीरात कुठेही पसरू शकते.

कॅन्सर 'या' तीन प्रकारे पसरू शकतो

1. डायरेक्ट स्प्रेड : कॅन्सर पेशी थेट स्वतः भोवतालच्या पेशीं किंवा अवयवांमध्ये अतिक्रमण करतात

2. लिम्फयाटिक स्प्रेड : कँसर पेशी लिम्फयाटिक ड्रेनेज सिस्टीममध्ये प्रवेश करून लिम्फ नोडमध्ये फोफावतात

3. हेमॅटॉलॉजिकल स्प्रेड : कँसर पेशी रक्तवाहिन्यांद्वारे फुफ्फुस, हाडे, लिव्हर किंवा ब्रेनमध्ये पसरतात.

कॅन्सरचे किती प्रकार आहेत ?

मुख्यतः कॅन्सर ची सुरुवात कुठल्या पेशीमध्ये झाली त्याप्रमाणे पेशीनुसार , किंव्हा अवयवानुसार असे दोन प्रकारे वर्गीकरण करता येईल.

अवयवनुसार वर्गीकरण :

कॅन्सर ची सुरुवात ज्या अवयवामध्ये होते, त्या नुसार कॅन्सरचे नामकरण केले जाते. उदाहरणार्थ, फुफ्फुसाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, आतडीचा कॅन्सर इत्यादी.

पेशीच्या वर्गीकरणानुसार कॅन्सरचे वर्गीकरण

1. कार्सिनोमा (Carcinoma) - हा अतिशय प्रचिलित असणारा कॅन्सर असून त्वचा किंवा अवयवतील इपिथेलिअल (epithelial) पेशीं मध्ये होतो. कार्सिनोमाअंतर्गत Adenocarcinoma (फुफ्फुस, स्तन), Basal Cell Carcinoma (त्वचा), Transitional (मूत्रपिंड ) असे उपप्रकार आढळतात.

2. सार्कोमा (Sarcoma) - हा कॅन्सर शरीरातील कनेक्टिव्ह टिशु किंवा सपोर्टिव्ह पेशीमध्ये आढळतो. कॅन्सरची सुरुवात हाडांच्या पेशीमध्ये झाल्यास Osteosarcoma, मास पेशी (Myosarcoma ), मेध पेशी (Liposarcoma ), कार्टिलेज पेशी (Chondrosarcoma ), रक्तवाहिन्या (Angiosarcoma ) असे वेगवेगळे कॅन्सर असतात.

3. मेलॅनोमा (Melanoma) - हा कॅन्सर त्वचेमधील मेलॅनिन बनवणाऱ्या मेलॅनोसाइट (Melanocyte) पेशीमध्ये आढळतो. अतिशय वेगाने शरीरात पसरणारा कॅन्सर रोग मानला जातो.

4. ब्रेन ट्यूमर - मेंदूमधील वेगवेगळ्या पेशींपासून होणारे ग्लायो ब्लास्टोमा (Glioblastoma), ऍस्ट्रोसायटोमा (Astrocytoma), मेडूलो ब्लास्टोमा (Medulloblastom) इत्यादी सारखे कॅन्सर असतात.

कॅन्सर

फोटो स्रोत, Getty Images

ब्लड कॅन्सरचे प्रकार

ल्युकेमिया (Leukemia), लिंफोमा (Lymphoma ), मल्टिपल मायलोमा (Multiple Myloma ) असे मुख्य तीन प्रकार ब्लड कॅन्सर मध्ये आढळतात.

1. ल्युकेमिया : बोन मॅरोमधील पांढऱ्या रक्त पेशींची वाढ खुंटून प्रमाणापेक्षा जास्त Immature पेशी तयार होऊन संपूर्ण शरीरभर रक्तवाहिन्यांमध्ये पसरतात, या रोगात शक्य तो गाठी आढळत नाहीत.

2. लिंफोमा : लिम्फो साईट (Lymphocytes ) या पेशींची लिम्फ नोडमध्ये अनियंत्रित वाढ होऊन लिम्फ नोडच्या गाठी होतात

3. मल्टिपल मायलोमा : रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या बोन मॅरोमधील प्लाज्मा पेशींची अनियंत्रित वाढ होऊन मायलोमा पेशीमध्ये परावर्तित होतात व हाडांना डॅमेज करतात.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

हिपोक्रॅट्स यांनी खेकड्यासारखा प्रतिबिंबित होणारा रोग इथपासून सुरू झालेला कॅन्सरचा प्रवास आज अतिशय शास्त्रयुक्त पद्धतीने संशोधन करून नेमकी कुठे बिघाड झालीय, ते जाणून नेमके उपचार करण्यापर्यंतचा प्रवास, हा मानवाने किती प्रगती केली याचे द्योतक आहे.

तसंच, इथपर्यंतचा हा आश्वासक प्रवास केवळ सुरुवात आहे आणि आता जगभरात चालू असणारी संशोधने कॅन्सरसारखा दुर्धर रोग मुळातून नष्ट करणे शक्य आहे, या विचारांना बळकटी देणारी आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)