नर्गिस यांना लाँच करणारा, 'मदर इंडिया'सारखे अजरामर चित्रपट देणारा मेहबूब स्टुडिओ

मदर इंडिया चित्रपटाचं पोस्टर

फोटो स्रोत, Mother India Film Poster

फोटो कॅप्शन, मदर इंडिया चित्रपटाचं पोस्टर
  • Author, यासिर उस्मान
  • Role, चित्रपट इतिहासकार, बीबीसी हिंदीसाठी

भारतीय चित्रपटसृष्टीतील क्लासिक किंवा अजरामर चित्रपटांबद्दल जेव्हा बोललं जातं, तेव्हा त्यात 'मदर इंडिया' या चित्रपटाचा उल्लेख हमखास होतो.

या अप्रतिम चित्रपटाची निर्मिती मेहबूब खान यांच्या मेहबूब स्टुडिओनं केली होती. मेहबूब खान आणि त्यांच्या चित्रपट कंपनीची कहाणी अतिशय अद्भूत आहे. ती एका अशा माणसाच्या वेडाची, झपाटलेपणाची कहाणी आहे, जो पारंपरिक अर्थाने शिकलेला नव्हता.

मात्र त्या माणसाचे अफलातून चित्रपट आजदेखील फिल्म इन्स्टिट्यूट्समध्ये दाखवले जातात आणि त्यातून विद्यार्थ्यांना चित्रपटांबद्दल शिकवलं जातं.

ती व्यक्ती म्हणजे मेहबूब खान. 1907 मध्ये मेहबूब खान यांचा जन्म गुजरातमधील बिलिमोरामध्ये झाला होता. त्यांचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते.

वडिलांनी मुलाला शिकवण्याचा प्रयत्न तर केला, मात्र मुलाला शिक्षणातच रस नव्हता. मोठा झाल्यावर तर त्याला नाटक आणि चित्रपटांचं वेड लागलं. त्या मुलाला अभिनेता व्हायचं होतं. तो मुलगा म्हणजे सुप्रसिद्ध चित्रपटकार मेहबूब खान.

वयाच्या 16 व्या वर्षी ते मुंबईला पळून गेले. मात्र वडील त्यांना पकडून पुन्हा घरी घेऊन आले आणि त्यांचं लग्न लावून दिलं.

विवाह तर झाला, मात्र मेहबूब खान यांचं चित्रपटांचं वेड गेलं नाही, चित्रपटांबद्दलची त्यांची स्वप्नं अजूनही तशीच होती. मग एक दिवस नशीबानं कुस बदलली...

घोड्यांनी दाखवला चित्रपटांच्या दुनियेत जाण्याचा रस्ता

मेहबूब खान यांची भेट नूर मोहम्मद नावाच्या व्यक्तीशी झाली. नूर मोहम्मद चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी घोडे पुरवायचे.

मेहबूब खान पुन्हा मुंबईत आले आणि त्यांनी नूर मोहम्मद यांच्या घोड्यांच्या पागेत नोकरी सुरू केली. या घोड्यांच्या माध्यमातून चित्रपटापर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्यांना दिसू लागला होता.

हे काम करत असतानाच एक दिवस मेहबूब खान चित्रीकरणासाठी घोडे घेऊन गेले. तो चित्रपट होता, चंद्रशेखर या दक्षिण भारतातील एका चित्रपट निर्मात्याचा.

याच चित्रपटाच्या सेटवर मेहबूब खान यांनी चित्रीकरणात मदत करण्यास सुरूवात केली आणि पाहिलं की सेटवर नेमकं काय चालतं.

चित्रीकरण पाहिल्यानंतर अभिनेता होण्याच्या त्यांच्या स्वप्नाला आणखी पंख बळ मिळालं. त्यांनी चंद्रशेखर यांना विनंती केली. मग चंद्रशेखर यांनी मेहबूब खान यांना त्यांच्या स्टुडिओमध्ये सहाय्यक दिग्दर्शकाचं काम दिलं.

परदेशी चित्रपटकारांबरोबर मेहबूब खान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, परदेशी चित्रपटकारांबरोबर मेहबूबखान

जवळपास तीन वर्षांनंतर मेहबूब खान एक्स्ट्रा निर्माता म्हणून आर्देशीर ईराणी यांच्या इम्पीरियल फिल्म कंपनीत लागले. मात्र हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागलं की कोणीही त्यांना चित्रपटात हिरोचं काम देणार नाही.

मग ते चित्रपटांच्या कथांवर काम करू लागले.

1935 मध्ये सागर मूव्हीटोनच्या चित्रपटासाठी 28 वर्षांच्या मेहबूब खान यांनी त्यांच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. तो चित्रपट होता अल हिलाल. या चित्रपटानं तिकिटबारीवर चांगली कमाई केली आणि मग मेहबूब खान यांना आणखी चित्रपट मिळाले.

त्यांनी एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनवले. त्यांचा पुढील चित्रपट होता डेक्कन क्वीन (1936). तो एक अॅक्शन चित्रपट होता. तर त्यांचा मनमोहन (1937) हा रोमँटिक चित्रपट देवदासवर आधारित होता. त्यानंतरचा जागीरदार (1937) हा एक सस्पेन्स चित्रपट होता.

भक्कम महिला पात्रांवर आधारित चित्रपटांनी दिलं यश

अर्थात ज्या चित्रपटानं मेहबूब खान यांना मोठ्या दिग्दर्शकांच्या रांगेत उभं केलं, तो चित्रपट होता 1938 मध्ये आलेला 'हम, तुम और वो'. ही एका धाडसी, हिंमतवान महिलेची कहाणी होती. ही महिला समाजाविरुद्ध एकटीच उभी राहते. अशा मजबूत, सबळ महिला पात्र हे मेहबूब खान यांच्या चित्रपटांचं वैशिष्टयंच बनलं.

त्यांचा पुढील चित्रपट होता 'औरत'. खेड्यातील एक महिला आणि तिच्या मुलाची ही कहाणी होती. गावातील एक महिलेच्या संघर्षाची ही कहाणी मेहबूब खान यांची इतकी आवडती होती की काही वर्षांनी याच चित्रपटाच्या कथेवर आधारित चित्रपट त्यांनी बनवला.

तो चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरला आणि त्याचे नाव इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिलं गेलं. त्या चित्रपटाचं नाव मदर इंडिया. या चित्रपटाकडे अजूनही एक कल्ट क्लासिक आणि अजरामर कलाकृती म्हणून पाहिलं जातं.

'औरत' याच त्यांच्या चित्रपटाचा रिमेक करून त्यांनी अनेक वर्षांनी 'मदर इंडिया' हा चित्रपट बनवला होता.

फोटो स्रोत, Harper Collins

फोटो कॅप्शन, 'औरत' याच त्यांच्या चित्रपटाचा रिमेक करून त्यांनी अनेक वर्षांनी 'मदर इंडिया' हा चित्रपट बनवला होता.

दोन्ही चित्रपटांमधील पात्रांची नावंदेखील एकच होती. 'औरत' या चित्रपटातील नायिका होत्या सरदार अख्तर. त्या फक्त त्या चित्रपटाच्या नायिकाच नव्हत्या, तर नंतर त्या मेहबूब खान यांच्या दुसरी पत्नीदेखील झाल्या.

त्याचवर्षी मेहबूब यांचा 'अलीबाबा' हा एक फँटसी चित्रपट देखील प्रदर्शित झाला. मात्र त्यांचा बहन (1941) हा चित्रपट अधिक चर्चेत राहिला. हादेखील महिला-प्रधान कथा असलेला चित्रपट होता.

कम्युनिस्टांचा हातोडा आणि विळ्याचं चिन्ह झालं मेहबूब प्रॉडक्शन्सचा लोगो

1943 मध्ये मेहबूब खान यांनी त्यांच्या मेहबूब प्रॉडक्शन्स या चित्रपट कंपनीची सुरूवात केली.

चित्रपटांबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन आणि त्यांच्या विचारधारेनुसार त्यांनी लोगो म्हणून हातोडा आणि विळ्याची निवड केली. हे कम्युनिझमचं जागतिक प्रतीक मानलं जातं.

या चित्रपटाचे संगीतकार नौशाद मेहबूब स्टुडिओचे मुख्य संगीतकार झाले

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, या चित्रपटाचे संगीतकार नौशाद मेहबूब स्टुडिओचे मुख्य संगीतकार झाले

त्यातून हे स्पष्ट होतं की मेहबूब खान यांना सर्वसामान्य माणूस, शोषित आणि कष्टकऱ्यांच्या कथा पडद्यावर दाखवायच्या होत्या.

या लोगोबरोबर तो सुप्रसिद्ध शेर देखील यायचा: मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंज़ूर-ए-ख़ुदा होता है.

हिंदी चित्रपटसृष्टीत 'मुस्लिम सोशल' जॉनरची सुरुवात

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बॉम्बे टॉकीजचा किस्मत (1943) हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील तो पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटामुळे अशोक कुमार मोठे स्टार झाले.

मेहबूब खान यांनी अशोक कुमार यांना एक लाख रुपयांचं मानधन देत मेहबूब प्रॉडक्शन्सच्या पहिल्या चित्रपटात घेतलं. त्याकाळी कोणत्याही अभिनेत्याला मिळालेली ती सर्वात मोठी रक्कम होती.

तो चित्रपट होता नजमा (1943). या चित्रपटापासून हिंदी सिनेमात 'मुस्लिम-सोशल'चा एक नवा जॉनरा सुरू झाला.

त्याआधी हिंदीत तयार होणारे चित्रपट एकतर पौराणिक कथेवर आधारित असायचे किंवा ऐतिहासिक असायचे किंवा सामाजिक कथांवर आधारित असायचे. बहुतांश चित्रपटांमधील पात्र हिंदू समाजातीलच असायचे.

नजमा चित्रपटाच्या यशानंतर कित्येक दशकं 'मुस्लीम सोशल' शैलीतील चित्रपटांमध्ये मुस्लिम पात्र आणि मुस्लिम समाजाशी निगडीत कहाण्या रुपेरी पडद्यावर दाखवल्या गेल्या.

मात्र स्वत: मेहबूब खान यांना चित्रपटात साचेबद्धपणा किंवा तोचतोचपणा आवडायचा नाही. त्यांच्या पुढील चित्रपटात त्यांनी मोठा स्टार घेतला नाही की 'मुस्लीम सोशल'चा वापर केला नाही.

'तकदीर' या चित्रपटातून त्यांनी एका नव्या अभिनेत्रीला लाँच केलं. ती अभिनेत्री होती नर्गिस. या चित्रपटानं नर्गिस स्टार झाल्या.

मेहबूब स्टुडिओच्या एका गोदामात ठेवलेली चित्रपटांची रीळं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेहबूब स्टुडिओच्या एका गोदामात ठेवलेली चित्रपटांची रीळं

मेहबूब खान सातत्यानं हिट चित्रपट देत होते. त्यामुळे मोठे-मोठे स्टार त्यांच्यावर काम करण्यास उत्सुक असायचे. पुढील चित्रपटात त्यांनी त्याकाळातील सर्वाधिक चर्चेत असलेले स्टार घेतले. ते होते सुरेंद्र, सुरैया आणि नूरजहाँ. हे तिघेही त्यावेळेचे 'सिंगिंग सेंसेशन' होते.

1946 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव होतं, 'अनमोल घडी'. तो त्या वर्षातील सर्वात मोठा हिट चित्रपट होता. या चित्रपटातील गीतांनी धमाल उडवून दिली.

याच चित्रपटातून संगीतकार नौशाद मेहबूब स्टुडिओचे मुख्य संगीतकार झाले. मेहबूब खान यांच्या शेवटच्या चित्रपटापर्यंत हे नातं टिकलं.

मनोरंजनपर व्यावसायिक चित्रपट बनवत असतानाही मेहबूब खान प्रत्येक चित्रपटातून सामाजिक मुद्दे मांडत राहिले. 1947 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या 'ऐलान' या चित्रपटात मुस्लिम समाजातील चालीरितींवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

या चित्रपटात मुस्लिमांच्या शिक्षणावर आणि सुधारणांवर भर देण्यात आला होता. हा चित्रपट वादग्रस्त ठरला. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी झाली. मात्र तिकिटबारीवर चित्रपट हिट झाला.

आतापर्यंत मेहबूब प्रॉडक्शन्सचे चार चित्रपट सुपरहिट झाले होते. त्यामुळे मेहबूब खान यांचा बॅनर पूर्णपणे स्थिरावला होता. त्यांच्या पुढील मोठ्या चित्रपटाबरोबरच त्यांचं स्टुडिओचं स्वप्नदेखील प्रत्यक्षात येत होतं.

शहराच्या मध्यवर्ती भागात बांधला स्टुडिओ

मेहबूब खान फक्त दूरदृष्टी असलेले दिग्दर्शकच नव्हते, तर ते धोरणात्मक दृष्टीकोन असणारे चित्रपटकारदेखील होते. तोपर्यंतचे फिल्मिस्तान आणि बॉम्बे टॉकीजसारखे स्टुडिओ गोरेगाव आणि मालाडमध्ये होते. हा भाग त्याकाळी मुंबईच्या बाहेर होता.

त्यामुळे मेहबूब खान यांनी ठरवलं की त्यांचा स्टुडिओ मुंबईत मध्यवर्ती भागात म्हणजे मध्य मुंबईत असेल. स्टुडिओसाठी त्यांना वांद्रे पश्चिमचा परिसर आवडला. या भागात हिंदी चित्रपटातील बडे स्टार आणि निर्माते यांची घरं होती.

हॉलीवूडची भव्यता आणि शैलीचा मेहबूब खान यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी पुढील चित्रपट लाँच केला. त्यात त्याकाळचे तीन बडे स्टार होते. ते म्हणजे दिलीप कुमार, राज कपूर आणि नर्गिस.

तो चित्रपट होता अंदाज (1949). या चित्रपटानं तिकिटबारीवरचे तोपर्यंतचे सर्व विक्रम मोडले. तो हिंदी सिनेमातील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला. साहजिकच चित्रपटसृष्टीत मेहबूब स्टुडिओचं नाव दुमदुमत होतं.

मेहबूब स्टुडिओ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेहबूब स्टुडिओ

तीन वर्षांनी, त्यांनी पुन्हा एकदा धमाल उडवून दिली. 1952 मध्ये त्यांनी 'आन' हा चित्रपट प्रदर्शित केला. हा भारतातील पहिला टेक्नीकलर चित्रपट होता.

या चित्रपटात दिलीप कुमार आणि नादिरा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हॉलीवूडच्या चित्रपटांच्या प्रभावातून तयार करण्यात आलेला तो एक भव्य अॅक्शनपट होता.

या चित्रपटाची भव्यता, नेत्रदीपक सादरीकरण आणि निर्मिती मूल्यांमुळे प्रेक्षक थक्क झाले.

बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त ब्लॉकबस्टर ठरला. तिकिटबारीवर मेहबूब खान यांचा 'अनबीटन' रेकॉर्ड म्हणजे चित्रपट यशस्वी होण्याचा विक्रम अजूनही अबाधित होता.

मेहबूब स्टुडिओची उभारणी आणि पहिला फ्लॉप चित्रपट

'आन' चित्रपटाच्या यशानंतरच मुंबईतील वांद्रे पश्चिम मध्ये मेहबूब स्टुडिओचा पाया घालण्यात आला. 1954 मध्ये स्टुडिओचं बांधकाम पूर्ण झालं. मेहबूब स्टुडिओमध्ये 6 मोठे शूटिंग फ्लोअर आणि एक आधुनिक साउंड स्टुडिओ बांधण्यात आला होता.

स्टुडिओच्या उभारणीबरोबरच मेहबूब खान आणखी एका महत्त्वाकांक्षी चित्रपटाची निर्मिती करत होते. चित्रपटाचं नाव होतं, 'अमर'. चित्रपटाचे नायक होते दिलीप कुमार.

मेहबूब खान यांच्याबरोबर दिलीप कुमार यांचा हा तिसरा चित्रपट होता. मात्र यावेळेस चित्रपटाची कहाणी नेहमीपेक्षा खूपच वेगळी होती.

अमर या चित्रपटातून हिंदी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदा एक बलात्कारी नायक आणि त्याचा नीतिमूल्यांसंदर्भातील संघर्ष दाखवण्यात आला होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमर या चित्रपटातून हिंदी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदा एक बलात्कारी नायक आणि त्याचा नीतिमूल्यांसंदर्भातील संघर्ष दाखवण्यात आला होता

चित्रपटात अमर (दिलीप कुमार) एक वकील असतो. त्याचं अंजू (मधूबाला) या प्रेयसीवर प्रेम असतं. मात्र भावनेच्या आहारी जाऊन तो गावातील सोनिया नावाच्या एका निरागस मुलीवर (निम्मी) बलात्कार करतो.

हिंदी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच बलात्कार करणारा नायक आणि त्याचा नैतिक संघर्ष दाखवण्यात आला होता. दिलीप कुमार लोकप्रिय स्टार असूनदेखील प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली.

या चित्रपटानं अनेक वादांना जन्म दिला. भारतीय चित्रपटांचा नायक असा असणार का? मेहबूब खान यांची जादू ओसरू लागली होती का? या चित्रपटावर टीका होऊनदेखील मेहबूब खान यांच्या दृष्टीनं हा चित्रपट त्यांच्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक होता.

मेहबूब खान यांची जादू कायम राहणार का?

या प्रश्नाचं उत्तर मेहबूब खान यांना त्यांच्याच 17 वर्षे जुन्या चित्रपटाद्वारे मिळालं.

कॅथरिन मेयो नावाच्या एका अमेरिकन पत्रकारानं 1927 मध्ये 'मदर इंडिया' नावाचं एक वादग्रस्त पुस्तक लिहिलं होतं. त्यात भारतीय महिला, संस्कृती आणि समाजाबद्दल अनेक अपमानास्पद गोष्टीदेखील लिहिण्यात आल्या होत्या.

मेहबूब खान यांनी ठरवलं की मेहबूब स्टुडिओचा आतापर्यंतचा सर्वात भव्य आणि महागडा चित्रपटाचं नावदेखील 'मदर इंडिया' हेच असेल. हा चित्रपट रुपेरी पडदा गाजवेल आणि भारताच्या आत्म्याचं खरं चित्र सादर करेल.

या चित्रपटाच्या कथेसाठी त्यांनी 17 वर्षांपूर्वी त्यांनीच बनवलेल्या चित्रपटाची निवड केली, तो चित्रपट होता 'औरत'.

मात्र 'मदर इंडिया'ची कक्षा मेहबूब खान यांनी इतकी विस्तारली की चित्रपटाची नायिका राधा हिची कहाणी संपूर्ण भारताचीच कहाणी बनली. लोकांसाठी राधा फक्त एक महिला नव्हती. तर ती भारताचं प्रतीक झाली होती.

प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणारी मात्र तरीदेखील स्वत:च्या तत्वांवर ठाम असणारी महिला. जी आव्हानं राधासमोर होती, तीच आव्हानं सर्व देशासमोर देखील होती.

साहस, त्याग आणि आत्मसन्मानानं त्या आव्हानांना तोंड देण्याचा दृढनिश्चय हा या चित्रपटाचा आत्मा झाला.

या चित्रपटाची नायिका म्हणून मेहबूब खान यांनी नर्गिस यांची निवड केली. तोपर्यंत नर्गिस ग्लॅमरस आणि शहरी भूमिकांसाठी ओळखल्या जात होत्या. मात्र या चित्रपटात त्यांनी गावातील एका अशिक्षित महिलेची भूमिका केली. ही भूमिका त्यांच्या करियरमधील सर्वोत्तम भूमिका ठरली.

चित्रपट दिग्दर्शक मेहबूब खान, त्यांची पत्नी (डावीकडे) आणि नर्गिस (उजवीकडे)

फोटो स्रोत, Harper collins

फोटो कॅप्शन, चित्रपट दिग्दर्शक मेहबूब खान, त्यांची पत्नी (डावीकडे) आणि नर्गिस (उजवीकडे)

मदर इंडिया चित्रपटाच्या निर्मितीसाठी 40 लाख रुपयांचा खर्च आला होता. हा चित्रपट तोपर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट ठरला होता. मेहबूब खान यांच्यासाठी हा फक्त एक चित्रपट नव्हता, तर एक झपाटलेपण होतं.

इतकंच काय संगीतकार नौशाद या चित्रपटासाठी इतक्या समर्पितपणे काम करत होते की त्यांनी एक वर्षभर दुसऱ्या कोणत्याही चित्रपटासाठी काम केलं नाही.

राज कपूर नर्गिस यांची जोडी तुटली, सुनील दत्त-नर्गिस यांचा विवाह आणि या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी, यासारख्या या चित्रपटाशी संबंधित अनेक कहाण्या आहेत.

1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं इतिहास घडवला. जवाहरलाल नेहरू यांनी या चित्रपटाला नव्या भारताची गाथा असं म्हटलं होतं.

अॅकेडमी अवॉर्ड (ऑस्कर) साठी पाठवण्यात आलेला, मदर इंडिया हा पहिला भारतीय चित्रपट होता. दुर्दैवानं फक्त एका मतामुळे या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळू शकला नाही. मेहबूब खान यांचा हा सर्वोत्तम चित्रपट ठरला.

तसंच भारतीय चित्रपटसृष्टीचं ते एक महाकाव्य ठरलं. कोणताही चित्रपटकार आता या चित्रपटापेक्षा भव्य किंवा त्याची उंची गाठणारं काय करू शकणार होता.

मदर इंडियानंतर मेहबूब स्टुडिओदेखील शिखरावर पोहोचला. मेहबूब स्टुडिओच्या पुढील चित्रपटाबद्दल प्रचंड कुतुहल होतं. मात्र 1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सन ऑफ इंडिया' हा त्यांचा चित्रपट सर्वच दृष्टीनं प्रभावहीन ठरला.

हा चित्रपट तिकिटबारीवर सपशेल आपटला. मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केलेला तो शेवटचा चित्रपट होता.

नेहरूंच्या निधनाचा मानसिक धक्का

मेहबूब खान त्यांच्या पुढील चित्रपटावर काम करत होते. मात्र 27 मे 1964 ला एक दु:खद बातमी आली. भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं होतं.

असं म्हणतात की आपल्या आदर्शाच्या निधनाच्या बातमीनं मेहबूब खान यांना इतका मोठा धक्का बसला की दुसऱ्याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला.

मेहबूब खान यांच्या निधनानंतर मेहबूब स्टुडिओची आर्थिक स्थितीला उतरती कळा लागली. त्यांना तीन मुलं होती. मात्र त्यातील एकही जण चित्रपट दिग्दर्शक नव्हता. एक चित्रपट कंपनी म्हणून मेहबूब स्टुडिओ लयाला गेला.

मात्र एक स्टुडिओ म्हणून मेहबूब स्टुडिओ आजही उभा आहे. जुन्या काळातील तो बहुधा एकमेव स्टुडिओ असावा ज्यात आजदेखील मोठ-मोठ्या चित्रपटांचं आणि टीव्ही कार्यक्रमांचं चित्रीकरण होतं.

एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस मेहबूब स्टुडिओमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री तब्बू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस मेहबूब स्टुडिओमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री तब्बू

मेहबूब स्टुडिओमध्ये गुरू दत्त आणि देव आनंद यांच्या प्रसिद्ध चित्रपटांचीदेखील निर्मिती झाली.

हा स्टुडिओ फक्त मेहबूब खान यांच्या स्वप्नांचं मंदिर नव्हतं तर हिंदी सिनेमातील अनेक स्टार्सचा देखील तो 'मेहबूब' स्टुडिओ होता. गुरू दत्त यांनी त्यांच्या अजरामर 'कागज के फूल' चित्रपटाची निर्मिती याच स्टुडिओत केली.

अभिनेता-दिग्दर्शक देव आनंद यांचंदेखील हे दुसरं घर होतं. त्यांच्या नवकेतन प्रॉडक्शन्स या फिल्म कंपनीचे अनेक चित्रपट इथेच तयार व्हायचे.

'गाईड' आणि 'हम दोनो' सारख्या अफलातून चित्रपटांची निर्मितीदेखील मेहबूब स्टुडिओमध्येच झाली. अलीकडच्या काळातील संजय लीला भंसाळी यांचा 'ब्लॅक' आणि शाहरुख खान यांच्या 'चेन्नई एक्सप्रेस' सारख्या चित्रपटांचं चित्रीकरण देखील इथेच झालं.

जुने स्टुडिओ त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत असताना, मेहबूब स्टुडिओमध्ये अजूनही 'लाइट्स, कॅमेरा, ॲक्शन' हे शब्द ऐकू येत असतात.

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील वांद्रेमध्ये स्टुडिओ बांधण्याची मेहबूब खान यांची दूरदृष्टी नक्कीच कामी आली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.